मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेनं मंजूर केलेलं महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयक विधानपरिषदेतही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्र-कुलपती म्हणून राज्यातल्या विद्यापीठांवर काम करण्याचे अधिकार मिळणार आहेत. मात्र विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध करत काल सभात्याग केला.विद्यापीठाच्या शिक्षण प्रणालीत राजकीय हस्तक्षेप होण्याचा धोका या विधेयकातील तरतुदींवरून दिसत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राज्यपालांचे अधिकार या विधेयकाच्या माध्यमातून कमी करून त्यांना नाममात्र अधिकार देण्याचा प्रयत्न आहे, आजपर्यंत कुलगुरूंच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नव्हता मात्र आता या नव्या सुधारणांमुळे तो शक्य होणार आहे असं ते म्हणाले. विद्यापीठांना अधिकाधिक स्वायत्तता देण्याचा अंतर्भाव राष्ट्रीय शिक्षण धोरणात आहे. मात्र त्यालाच या विधेयकाने हरताळ फासलाय असं दरेकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयकावर सरकारनं चर्चाचं होऊ दिली नाही याबद्दल विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाबाहेर बोलताना जोरदार टीका केली आहे.