नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या अर्धवार्षिक वित्तीय स्थिरतेच्या अहवालानुसार पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. हे प्रमाण यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सहा पूर्णांक ९ दशांश टक्क्यांवर आलं होतं, जे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी प्रमाण होते. अडकलेल्या कर्जाचं प्रमाण अत्यंत वाईट स्थितीतही एकेरी आकड्यावरच राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नुकसान सहन करण्यासाठी बँकांकडे पुरेसे भांडवल आहे.सार्वजनिक बँकांची  सकल अनुत्पादक मालमत्ता पुढल्या सप्टेंबरपर्यंत १० पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बँकांचा ताळेबंद मजबूत असून भविष्यात प्रतिकूल स्थिती राहिल्यास त्याचा सामना करण्यासाठी वित्तीय तरलता आणि पुरेशा भांडवलाचा साठा ठेवला जात असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे.