मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आल्याने रात्री मैदानात थांबण्यास एसटी कामगारांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे कामगारांना पहाटे पाच ते संध्याकाळी पाच या काळातच आजाद मैदानात आंदोलन करता येणार आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्ण संख्या ८० लाखांपर्यंत जाऊ शकते, तर मृत्यूचा आकडाही ८० हजारांपर्यंत पोहोचेल, अशी शक्यता आरोग्य विभागाचे अप्पर सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाखांच्या वर पोहोचेल, असा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.