मुंबई (वृत्तसंस्था) : ३४ वं महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन डॉ. मेतन फाउंडेशननं, सामाजिक वनीकरण सोलापूर, आणि वन विभाग सोलापूर यांच्या सहकार्यानं येत्या ७, ८, आणि ९ तारखेला सोलापुरात आयोजित केलं आहे. डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी ही माहिती दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मा. श्री. मिलिंद शंभरकर आहेत. तर संमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ, निनाद शहा यांची निवड झाली आहे. या संमेलनाच्या कार्यशाळेचं उदघाटन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचं बोधचिन्ह म्हणून सापमार गरुड निवडला आहे. सोलापूर जिल्हा माळरान आणि गवताळ प्रदेश तसंच त्यावरच्या जैविक विविधतेसाठी समृद्ध आहे. या माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. त्यातला सापमार गरुड पक्षी या माळरानावरचं वैभव म्हणून ओळखला जातो. या संमेलनाची संकल्पना “माळरान- शिकार पक्षी – संवर्धन” ही आहे. या संमेलनामध्ये पक्षी निरिक्षण भ्रमंतीसाठी हिप्परगा तलावाची भ्रमंती, सिद्धेश्वर वनविहाराची भ्रमंती आणि माळरानावर भ्रमंती आयोजित केली आहे.