नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारोंच्या जनसमुदायानं साश्रू-नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला. शहीद यश देशमुख यांचं पार्थिव नाशिक इथून आज सकाळी आणल्यावर गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.
अवघ्या २१ व्या वर्षी यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाल्यानं पूर्ण गाव शोकमग्न असून पिंपळगावजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी करण्यात येणार असणाऱ्या परिसरात देशभक्तीपर संदेश असणारी रांगोळी आणि फुलांची आरास केली होती.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, लष्करी आणि पोलीस जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.