नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे,अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांना भेट देत आहेत.पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्युट, अहमदाबाद इथं झायडस बायोटेक आणि हैदराबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थांना भेट देऊन ते लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत.
तीन शहरांच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या लसीकरण प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पामध्ये जायकोव्ही-डी. ही लस तयार केली जात असून, या लसीवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांशी आणि अधिकार्यां शी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मोदी याचं हैदराबाद इथं आगमन झालं असून, ते भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट देऊन,लस निर्मितीचा आढावा घेतील.
ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर च्या सहकार्यानं, कोवॅक्सीन लसीची निर्मिती करत आहे. त्यानंतर पंतप्रधान पुण्यातल्या सीरम इन्स्टीट्युटला भेट देऊन “कोविशील्ड ” या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिचं वितरण आणि पुरवठा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत.
दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी मोदी यांचं हैदराबादहून पुण्यातील लोहगाव विमानतळावर आगमन होणार असून, नंतर एका विशेष हेलिकॉप्टरने ते सिरममध्ये दाखल होतील . दुपारी ४.२५ ते ५.२५ पर्यंत ते सिरममध्ये लसीच्या उत्पादन प्रक्रियेची पाहणी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
त्यानंतर ५ वाजून ५५ मिनिटांनी लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान दिल्लीकडे रवाना होतील. मोदी यांच्या या दौऱ्यानंतर ४ डिसेंबर रोजी विविध देशांचे १०० राजदूत पुण्यात येणार होते, मात्र त्यांचा हा दौरा तूर्त स्थगित झाला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला कळवली आहे.
भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळे,आगामी लसीकरण, त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे.