नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यांमध्ये सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटींसंदर्भात चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. कॅबिनेट सचिवालयातले सुरक्षा सचिव सुधीर कुमार सक्सेना यांच्या अध्यक्षतेतल्या या समितीमध्ये गुप्तचर विभागाचे संयुक्त संचालक बलबीर सिंग आणि SPG चे पोलिस महानिरीक्षक एस सुरेश यांचा समावेश आहे. या समितीने आज फिरोजपूर इथे भेट दिली आणि प्रधानमंत्र्यांची गाडी थांबली होती तिथे भेट देउन परिस्थितीचा आढावा घेतला. समितीने पंजाबचे पोलिस महासंचालक आणि इतर तेरा अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले असून ही समिती लवकरात लवकर आपला अहवाल सादर करेल.