मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविषाणूपासून राज्य कायमचं मुक्त करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला काम बंद करायचं नाही, तर गर्दी बंद करायची आहे. रोजीरोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचं नाही पण काही बंधन घालून राज्य कोरोनामुक्त करायचं आहे, असं ते म्हणाले. कोरोनाचे दूत बनून इतरांचं आरोग्य धोक्यात आणू नका, आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा करु नका, असं आव्हान त्यांनी आपल्या निवेदनातून आज जनतेला केलं. नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत. आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली असून, हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं कोरोनाचे नियम पाळायचे आहेत असं ते म्हणाले. सरकारनं घालून दिलेले निर्बंध तोडू नका, सर्वात मह्त्त्वाचं म्हणजे थोडी जरी लक्षणं आढळली तरी आपल्या डॉक्टरांना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या. या सगळ्यामधे लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्याबाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.