मुंबई : मागील पाच वर्षात महाराष्ट्रात 3 लाख 51 हजार 378 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून देशातील एकूण गुंतवणुकीपैकी राज्याचा वाटा 30 टक्के आहे. महाराष्ट्र हे देश विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रथम पसंतीचे राज्य असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

देशातील उत्पन्नात राज्याचा 14.93 टक्के वाटा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची मागील पाच वर्षात सरासरी वाढ 9 टक्के होती. देशातील औद्योगिक उत्पादन व नक्त मूल्यवृद्धीमध्ये राज्याचा 20 टक्के वाटा आहे. सेवा क्षेत्राचा स्थूल उत्पन्नातील वाटा 55 टक्के आहे.

केंद्र शासनाच्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभागाच्या अहवालानुसार सन-2014 ते  मार्च-2019 अखेरपर्यंत 1,794 एवढ्या औद्योगिक उपक्रमांनी केंद्र शासनाकडे औद्योगिक उद्योजकांचे ज्ञापन सादर केलेले असून याद्वारे रु. 2 लाख 46 हजार 915 कोटी गुंतवणूक झालेली असून त्यामधुन 5.40 लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

मागील पाच वर्षात राज्यात एकूण 10 लाख 27 हजार 07 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग स्थापित झालेले असून, त्यामध्ये रु. 1 लाख 65 हजार 62 कोटी गुंतवणूक झाली आहे व 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

फेब्रुवारी-2016 मध्ये झालेल्या मेक इन इंडिया सप्ताह दरम्यान रु. 8 लक्ष कोटी एवढ्या गुंतवणुकीचे एकूण 2 हजार 984 सामंजस्य करार झाले असून त्यातून अंदाजे 30 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.  यापैकी मार्च-2019 अखेर, 1180 उद्योग स्थापन झाले असून त्याद्वारे रु. 1 लक्ष कोटी एवढी गुंतवणूक व 3.5 लक्ष रोजगार निर्मिती झाली आहे.

फेब्रुवारी-2018 मध्ये झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र गुंतवणूक परिषदेमध्ये 3964 एवढे सामंजस्य करार करण्यात आले . त्याद्वारे अंदाजे रु. 12 लक्ष कोटी गुंतवणूक व 36.94 लक्ष रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

राज्यात विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाल्यापासून 643 विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. याद्वारे रु. 4.79 लक्ष कोटी गुंतवणूक व 5.22 लक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, अशी माहिती उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.