नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोवीड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल सांगितलं. मात्र या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी उपलब्ध राहावं लागेल असं ते म्हणाले. कोविड प्रादुर्भावामुळे प्रतिबंधित म्हणून घोषित झालेल्या क्षेत्रातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा परिसर विना-प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होईपर्यंत कार्यालयातल्या उपस्थितीमधून सूट देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी कार्यालयात अवर सचिव पदाच्या खालच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के इतकी सीमित करण्यात आली असून उर्वरित कर्मचारी घरून काम करतील असं ते म्हणाले.