मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र सरकारच्या एससीईआरटी, अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती केली आहे. यातून स्थलांतरित, परराज्यातून आलेले, अनियमित विद्यार्थी, नव्याने सापडलेली मुले अशा चार प्रकारच्या मुलांची नोंद होणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर ही माहिती ॲपमध्ये एकत्रित उपलब्ध होईल. प्रायोगिक तत्त्वावर या ऍपची चाचणी बीड, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर आणि चंद्रपूर ह्या पाच जिल्ह्यात केली आहे. आता या महिन्यात राज्यभर या अॅपद्वारे चाचणी घेतली जाणार आहे.