नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री, राजकुमार फैजल बिन फरहान अल सौद आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही भेट होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची काल भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोविडची लाट पसरल्यानंतरची त्या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर हितांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर तसंच द्वीपक्षिय संबंधांशी निगडीत सर्व बाबींवर चर्चा केली. ऑक्टोबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान करण्यात आलेल्या धोरणात्मक भागिदारी परिषद कराराच्या अंमलबजावणीचा देखील या दोन्ही मंत्र्यांनी आढावा घेतला. या कराराखाली आयोजित केलेल्या बैठकींबद्दल आणि त्यातील प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षितता, संस्कृति, वाणिज्य कचेरीचे मुद्दे, आरोग्य सेवा आणि मनुष्य बळ अधिक बळकट करण्यासाठी पुढील उपायांवर देखील दोन्ही देशांनी चर्चा केली.