नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणानं पाच कोटींचा टप्पा पार केला आहे. यापैकी ४ कोटींहून अधिक लोकांना लसीची पहिली मात्रा तर ९३ लाखांहून अधिक लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा देऊन झाल्या आहेत. आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सांगितलं की राज्यातील किमान ७० टक्के लोकांनी लसीची एक मात्रा घेतली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या संक्रमणातून सात लाख १६ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर ९८ टक्क्यांवर गेला असून पॉझिटीविटीचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पाटणा, गया आणि नालंदासह राज्यातल्या चौतीस जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.