नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. लसीकरण मोहिमेनं कोविड१९ विरुद्धच्या लढ्याला मोठं बळ मिळवून दिलं आहे. अनेकांचे प्राण वाचवले आहेत, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी केलेलं काम अपवादात्मक आहे. दुर्गम क्षेत्रातल्या नागरिकांचं लसीकरण होत असल्याचं पाहताना आपल्या मनात आणि हृदयात अभिमान दाटून येतो, असं त्यांनी म्हटलं आहे. या महामारीच्या प्रारंभीच्या काळात देशात या विषाणूबाबत फारशी माहिती नव्हती. पण त्यानंतर मात्र भारताच्या शास्त्रज्ञांनी लस विकसित करण्यापर्यंत मजल मारली. लसीच्या माध्यमातून कोविड विरोधी लढ्यात भारत योगदान देऊ शकला याचा अभिमान वाटतो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करुन या महामारीवर मात करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोविड१९ प्रतिबंधासाठी देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु झाल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. या वेळी १६ जानेवारी २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन करताना म्हटलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या वेगाने लसीकरण अभियान राबवण्याची घटना इतिहासात झालेली नाही. अभूतपूर्व व्याप्तीच्या या मोहिमेत १६ जानेवारीला आरोग्य आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात आली, नंतर इतर कोविड योद्ध्यांना २ फेब्रुवारी पासून, ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना आणि ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सहव्याधी बाधितांना १ मार्चपासून तर १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्वांना १ मे २०२१ पासून लस मिळू लागली. कोविड योद्ध्यांसाठी आणि ज्येष्ठांसाठी वर्धक मात्रा १० जानेवारीपासून खुली झाली आहे. या मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व सहभागी वैज्ञानिक, आरोग्य कार्यकर्ते, आणि देशवासियांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ही महाकाय मोहीम जगातली सर्वात यशस्वी लसीकरण मोहीम ठरली असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. या मोहिमेच्या सफलतेबद्दल भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, आणि वैज्ञानिकांचे आभार मानले आहेत. ट्विटर संदेशात ते म्हणतात, कोविडविरुद्धच्या लढ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सारा देश एकवटला असून या मोहिमेने अशक्य ते शक्य करुन दाखवलं आहे. देशाच्या या कामगिरीला साऱ्या जगाने दाद दिली आहे.