नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर उद्यापासून संसदेच्य़ा अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सकाळी सुरुवात होईल. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात वर्ष-२०२१ -२०२२ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर राज्यसभेतही हा अर्थसंकल्प सादर केला जाईल.  कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज बुधवारपासून २ पाळ्यांमध्ये चालवलं जाणार आहे.

राज्यसभेचं कामकाज सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत, तर  लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार ते रात्रौ नऊ वाजेपर्यंत सुरु राहिल. अर्थसंकल्पीय अधिवेशनचा  पहिला भाग ११ फेब्रुवारापर्यंत सुरु राहील. यात १० सत्र होतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन आणि अर्थसंकल्पावरील चर्चा हे पहिल्या भागाचं मुख्य कामकाज असेल. पहिल्या भागानंतर एक महिन्याची सुट्टी असेल. त्यानंतर दुसरा भाग १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल. या भागात १९ सत्र असतील.

पहिल्यांदाच राज्यसभेत शून्य प्रहर एक तासाऐवजी अर्ध्या तासाचा करण्यात आला आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारनं उद्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक दुपारी ३ वाजता बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी कामकाजाचे विषय ठरवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची संध्याकाळी पाच वाजता दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक बोलावली आहे.