नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनं देश विकासाच्या नव्या उंचीवर पोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांनी पाठवलेली पत्र आणि त्यांनी व्यक्त केलेली स्वप्न त्यांनी जनतेसमोर मांडली. याच स्वप्नांचा दाखला देत त्यांनी भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी सर्व देशवासियांनी, युवा पिढीनं मिळून काम करावं, असं आवाहन केलं.

भारताच्या संस्कृतीतल्या विविधांगी छटा आणि अध्यात्मिक शक्तीनं जगभरातल्या लोकांना आकर्षित केलं आहे. देशाची संस्कृती केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी अनमोल वारसा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.

निसर्गाविषयीचं प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा ही आपली संस्कृती आणि स्वभावैशिष्ट्य देखील आहे, भारतीयांच्या मनातल्या निसर्ग आणि जीवसृष्टी विषयीच्या प्रेमाचं संपूर्ण जगात कौतुक होत असतं असं त्यांनी सांगितलं.

भारत ही कायमच शिक्षण आणि ज्ञानाची तपोभूमी राहिली आहे, असं ते म्हणाले. देशातल्या शिक्षण क्षेत्राचं सक्षमीकरण करण्यासाठी, देशभरात माजी विद्यार्थी, सामन्य व्यक्ती तसंच संस्थात्मक अशा विविध पातळ्यांवर होत असलेल्या प्रयत्नांची दखल प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये घेतली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देश आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची पुनर्स्थापना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी प्रधानमंत्र्यांनी प्रसिद्धीपासून दूर असलेल्या, पण आपल्या असामान्य कर्तृत्वानं पद्म पुरस्कारावर नाव कोरलेल्या व्यक्तीमत्वांविषयी माहिती दिली. देशाच्या गौरवात योगदानात दिलेल्या अशा अज्ञात नायकांबद्दल आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं. बालपुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीबद्दल पालकांनी आपल्या मुलांना माहिती द्यावी, त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल असं ते म्हणाले.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिममित्त प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्मरण केलं. तसंच यावर्षीप्रमाणेच यापुढे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा, २३ जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी सुरु होऊन ३० जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीपर्यंत सुरु राहील, असं त्यांनी सांगितलं.

देश कोरोनाविरुद्ध देत असलेला लढा आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीमेतल्या देशाच्या कामगिरीविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. स्वच्छता अभियान, प्लास्टिकविरुद्धचं अभियान, तसंच  ‘वोकल फॉर लोकल’हा मंत्र जपत राहून आत्मनिर्भर भारत अभियान कार्यरत ठेवायचं आवाहनही त्यांनी केलं.