नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात, सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनीही उद्या सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारनंही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळावं यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला दोन्ही सभागृहातील फक्त राजकीय पक्षांच्या नेत्यांनाच आमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं उद्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल.
उद्याचं २०२१- २२ वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केलं जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करतील. कोविड सुरक्षेशी संबंधित सूचनांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहांचं कामकाज वेगवेगळ्या वेळांमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी १० ते दुपारी ३ आणि लोकसभेचं कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल तर दुसरा टप्पा १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असेल.