मुंबई : रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामपंचायतींप्रमाणेच नगरपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून या  दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.

रोहयो विभागाची आढावा बैठक मंत्रालयात रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव नंद कुमार आदी उपस्थित होते.

रोहयो मंत्री श्री. भुमरे म्हणाले, ‘रोहयो अंतर्गत ग्रामीण भागात रोजगारासोबतच शेतीला चालना मिळत आहे. फळबागांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असल्याने असंख्य शेतकऱ्यांनी फळबागा फुलवल्या आहेत. पाणंद रस्ते, विहीरी, शेततळे, फळबागा आदी कामांसाठी रोहयो अंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करावे.’

शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रसिद्धी करून त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करावी, अशी सूचना राज्यमंत्री श्री.बनसोडे यांनी केली. वार्षीक कार्यक्रम 2022-23 ची आखणी, 2021-22 या वर्षातील कुशल व अकुशल मनरेगा कामांच्या खर्चाचा आढावा, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते मंजुरी, पन्नीसह शेततळ्यांची प्रगती, मनरेगा अंतर्गत फळझाड लागवड आदी विषयांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.