मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घातलेले निर्बंध, कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पुन्हा शिथिल केले आहेत. यासंदर्भातला आदेश काल सरकारनं जारी केला. त्यानुसार आजपासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी पार्क सुरू होणार आहेत. करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेनं, उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणानं निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास परवानगी दिली आह़े. अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटवली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. लग्नसोहळ्यासाठी आता मोकळ्या जागेत, किंवा बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या २५ टक्के, किंवा कमाल २०० लोक उपस्थित राहू शकतील. तर स्थानिक, लोककला, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कार्यक्रमस्थळाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे.