मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार मंत्री तथा कमर्चारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची 112 वी बैठक काल मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढली जाणार असून, आता लोकसंख्या तसंच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारलं जाईल, असं त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयांना प्राधान्यानं सर्व सोयीसुविधा देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. आरोग्य मंत्री आणि ई.एस.आय.सी.चे उपाध्यक्ष राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी असल्यानं ती तात्काळ भरण्यासाठी एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले. आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीनन डॉक्टर्स तसंच नर्सेसची पदं भरावीत, असं त्यांनी सांगितलं.