मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षाचा 45 हजार 149 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. कोरानाच्या काळात सादर झालेल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 6 हजार 910 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या पालिकेच्या अर्थसंकल्पामधला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 32 हजार कोटी, आरोग्य सेवेवर 2 हजार 650 कोटी, रस्त्यांच्या विकासासाठी 2 हजार 200 कोटी, पूल बांधणी आणि पूलांच्या दुरूस्तीसाठी 1 हजार 576 कोटी रुपये, गोरेगाव लिंक रोडसाठी 13 शे कोटी तर विकास नियोजनासाठी 1 हजार 2 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2022-23 या वर्षासाठी उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी जकातीपोटी नुकसान भरपाई म्हणून मिळणारं उत्पन्न 11 हजार 429 कोटी, मालमत्ता करापोटी मिळणारं उत्पन्न सात हजार कोटी, विकास नियोजनापोटी 3 हजार 950 कोटी, तर गुंतवणूकीवरच्या व्याजापोटी मिळणारं उत्पन्न 1 हजार 128 कोटी रुपये आहे. यंदा मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. मुंबईकरांना आरोग्यदायी, आनंदी जीवन देवून पायाभूत सुविधांची दर्जोन्नती आणि अंमलबजावणी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचं पालिका आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं.