नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकीसाठीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या गेट अर्थात ग्रॅज्युएट अॅप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीयरींग २०२२ परीक्षा पुढं ढकलण्यास आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. गेट परीक्षा घेण्यात विलंब झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल गोंधळाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण होईल याकडे सर्वोच्च न्यायालयानं लक्ष्य वेधलं. तसंच कोरोना महामारीची पहिली आणि दुसरी लाट तिसऱ्या आणि सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीपेक्षा वेगळी होती. त्यामुळेच सरकारला २० हून अधिक परीक्षा पुढं ढकलाव्या लागल्या होत्या असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गेट परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयानंच हीरवा कंदील दिल्यानं आता विद्यार्थ्यांना गेट परीक्षेसाठी व्यक्तीशः उपस्थित राहावं लागणार आहे.