मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अ तिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतीमध्ये लोकप्रतिनिधींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. प्रभागांचे विभाजन नको असा अशा हरकती मोठया प्रमाणात आल्या आहेत. अंधेरी पूर्व, कांदिवली, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला या भागातून सूचना आणि हरकतींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं  दिसून आलं. कुलाबा इथून एकही हरकत किंवा सूचना आलेली नाही. नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या  प्रभाग आरक्षणावर ३ हजार ८५२ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर १७ तारखेला सुनावणी होणार असून त्या दिवशी सुनावणी पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशीही सुनावणी होणार आहे. दिघा विभागापासून बेलापूर विभाग या पध्दतीने करण्यात आलेल्या प्रभागरचनेमुळे प्रभाग बदलले आहेत. बहुसदस्यीय पध्दतीने ही निवडणुक होणार आहे. एका प्रभागात ३ नगरसेवक याप्रमाणे ४१ प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेच्या प्रभाग रचनेवर काल २११ हरकती प्राप्त झाल्याचं महापालिका प्रशासनानं  सांगितलं. १ फेब्रुवारी रोजी महापालिकेची प्रभाग रचना घोषित झाल्या नंतर त्यावर हरकती आणि सूचना पाठवण्यासाठीचा काल अखेरचा दिवस होता. येत्या २३ तारखेला सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विनीकुमार मुदगल यांच्या उपस्थितीत हरकतींवर सुनावणी होणार असल्याचं प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी सांगितलं.