मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक घेतली. यामध्ये सागरमाला उपक्रमा अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला. वेगवान आर्थिक विकास आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीनं या उपक्रमांना जलद गतीनं पूर्णत्वास नेण्याच्या सूचना या बैठकीत सोनोवाल यांनी दिल्या.
सागरमाला या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रानं २७९ कोटी रुपयांचे ९ उपक्रम पूर्ण केले आहेत, तर ७७७ कोटी रुपयांचे आणखी १८ उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मुंबई बंदराच्या मालवाहतूक सेवा अर्थात कोर्गो सेवेचा विकास करण्याच्या दृष्टीनं वाढवण बंदराची निर्मिती करण्यात येत आहे. त्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला. राष्ट्रीय सागरी संपत्ती संकुलाच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या सागरी संपत्तीचं दर्शन घडविणारं दालन उभारण्याची संकल्पनाही त्यांनी यावेळी मांडली.