वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव सिध्देश्वर उमरकर यांनी सुतमालेने स्वागत केले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत सामुहिक प्रार्थना सभेत उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्रायदेखील नोंदविला.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलिस विभागाव्दारे आयोजित बापूकुटी ते चरखागृहापर्यंत जाणाऱ्या पोलिस शिपाई दौड रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गक्रमण केले.