मुंबई : मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते.

या विधानात महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरणही करण्यात आले आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शासकीय अधिकार्‍याकडून असा प्रमाद घडावा व शासनाने त्याकडे काणाडोळा करावा हे अशोभनीय आहे.

शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदराव पवार यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना केली.