मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबईतल्या मिळून ३० ठिकाणी नुकतीच ही कारवाई केली. या व्यावसायिकांनी आवश्यकतेपेक्षा जास्त आणि कागदोपत्री न दाखवता मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचा साठा केला होता. त्याचप्रमाणे अनेक बेहिशेबी व्यवहार करुन जीएसटीही चोरी केल्याचं प्राप्तिकर खात्याला आढळून आलं होतं.