एमएसएमई क्षेत्रासाठी ऊर्जा संवर्धन मार्गदर्शक तत्वे आणि माहिती व्यवस्थापन पोर्टल ‘सिद्धी’ चे ही उद्घाटन
नवी दिल्ली : एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी आणि ऊर्जा राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते दिल्लीत संयुक्तरित्या उद्घाटन झाले. ऊर्जा क्षमता विभागाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत एमएसएमई क्षेत्रातले उद्योजक, सहकारी, तंत्रज्ञ आणि सेवा पुरवठादार अशा सर्वांच्या सहभागातून ऊर्जा क्षमता वाढवण्यावर माहिती दिली जाणार आहे. या परिषदेत ऊर्जा क्षमता तंत्रज्ञान वापरण्याविषयक एक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.
एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याबद्दल गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. या परिषदेतून ऊर्जा संवर्धन तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात याची माहिती मिळू शकेल असे गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. ऊर्जा क्षमता वाढल्यानंतर एमएसएमई क्षेत्रावरचा आर्थिक भारही कमी होईल ज्याचा लाभ या लघु उद्योगांना होईल असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात देशात औद्योगिक ऊर्जेची गरज दुपटीने वाढली आहे अशी माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी यावेळी दिली. 2040 पर्यंत ही मागणी तिपटीने वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे ऊर्जा निर्मिती सोबतच ऊर्जा बचत आणि ऊर्जा क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे असे ते म्हणाले. त्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.