नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आज लष्करी कारवाईला सुरुवात केली.रशियन लष्कराने सीमा ओलांडत क्रायमियात प्रवेश केला. युक्रेनच्या काही शहरामधून स्फोटाचे आवाज ऐकू आले. युक्रेनची राजधानी किए्वजवळच्या विमानतळावर चकमक उडाल्याचं वृत्त आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनियन सैनिकांना शस्त्रास्त्रं खाली ठेवून परतण्याचं आवाहन केलं आहे.जगाच्या चिंतेचं कारण ठरलेल्या युक्रेन आणि रशियामधल्या तणावाचं युद्धात रुपांतर होण्याची स्पष्ट चिन्हं आज दिसत आहेत. युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ले केल्याचं म्हटलं आहे, तर युक्रेनच्या सीमेवर रशियाच्या लष्करी तुकड्या आणि रणगाडे उभे असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कि यांनी म्हटलं आहे.अमेरिका आणि इतर देश युक्रेनवरच्या या आक्रमणाला एकत्रितपणे विरोध करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं. या आक्रमणाला जगाने एकदिलाने विरोध करावा असं आवाहनही त्यांनी केलं. संपत्ती आणि जिवितहानीला आमंत्रण देणारं युद्ध पुकारल्याबद्दल व्लादिमीर पुतिन यांची अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी निंदा केली आहे. तर युक्रेनच्या नाटोमधल्या सामिलीकरणाला असणारा रशियाचा विरोध दुर्लक्षीत केल्याबद्दल पुतिन यांनी नाटो आणि संयुक्त राष्ट्राला दोष दिला आहे.