मुंबई : ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे (ऑस्कर अकादमी) अध्यक्ष जॉन बेली आणि त्यांच्या पत्नी कॅरॉल लिटलटन यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची त्यांच्या सेवासदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

मंत्री श्री. तावडे यांनी जॉन बेली यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या बैठकीत श्री. तावडे यांनी ऑस्कर ॲकॅडमीमध्ये बनत असलेल्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा असावा अशी मागणी केली. ऑस्कर अकादमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. भारतासह मुंबईमधील मराठी चित्रपटसृष्टी व हिंदी चित्रपटसृष्टी त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.

या प्रसंगी ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेसचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सौ. वर्षा तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.