नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन संपेपर्यंत मुंबई पोलिसातल्या जवानांना बारा तासाच्या शिफ्टनंतर २४ तासाची विश्रांती मिळणार आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयानं ही माहिती दिली आहे.

५५ वर्षावरच्या सर्व पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, ज्या पोलिसांना मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे आजार आहे अशा ५२ वर्षांवरच्या पोलिसांनाही घरी थांबण्याचे निर्देश दिले आहेत. तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

राज्यात आतापर्यंत वीस अधिकाऱ्यांसह १०७ पोलिस कर्मचाऱ्यांना याची लागण झाली असून यात बहुतांश मुंबईतले आहेत.

पोलिसांची प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सल्ल्यानंतर १२ हजार पोलिसांना हाइड्रोक्सी क्लोरोक्वीनच्या तर २० हजार पोलिसांना मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या आहेत. सर्व पोलिसांना आवश्यक पीपीई किट्, फेस मास्क, हँड सॅनेटाईझर, ग्लोव्हस्, फेस शिल्ड पुरवल्या आहेत. याशिवाय पोलिसांच्या आरोग्यासाठी विशेष हॉस्पिटल्स् तर कोविड हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही खाटा आरक्षित ठेवल्या आहेत.