मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पीएनजी – इंधन वायू वाहिनीच्या कामाचा प्रारंभ होणं, ही औरंगाबाद तसंच मराठवाड्यासाठी नव्या युगाची सुरवात असल्याचं, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद शहरात निवासी आणि औद्योगिक वापरासाठी पीएनजी – इंधन वायू वाहिनी टाकण्याच्या कामाची आज सुरुवात झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते कळ दाबून या योजनेच्या नामफलकाचं अनावरण झालं. येत्या काही वर्षात देशभरात घरोघरी वायूवाहिनीद्वारे घरगुती वापराचा गॅस पोहोचवण्याचं उद्दीष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. गरिबाला १०० रूपये दरात गॅस जोडणी प्रकल्पामुळे देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं कौतुक होत आहे, असं कराड म्हणाले. यापुढेही मराठवाड्याच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. वातावरणातलं प्रदूषण कमी करुन, माफक दरात सीएनजी आणि घराघरात घरगुती गॅस पोचवण्याची ही योजना आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हे काम करत आहे.