पुणे : जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथ आणि एलईडी वाहनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी आयुक्त धीरज कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.महेश गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, माहिती सहायक गणेश फुंदे, संदीप राठोड आदी उपस्थित होते.
पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी जनजागृती उपक्रमाची माहिती दिली. डॉ.मोघे यांनी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रसिद्धी उपक्रमांची माहिती दिली.
चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या भागातील प्रत्येकी १५० पेक्षा अधिक गावातून फिरणार आहे. संकल्पनेशी संबंधित ५ विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहे. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, डॉ.महेश गायकवाड यांच्या संदेशाचादेखील समावेश करण्यात आला आहे. या चित्रफीती नंतर शाळांमधूनदेखील दाखविण्यात येणार आहेत.