नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी इस्रायलचा गुप्तहेर तळ होता तो उद्ध्वस्त करण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र नागरी रहिवासी क्षेत्रावरचा हा हल्ला पूर्णपणे असमर्थनीय असल्याचं सांगत अमेरिकेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ता नेड प्राईस यांनी सांगितलं की या हल्ल्यात अमेरिकेसाठी जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. हल्ल्याविरोधात अमेरिका इराकच्या पाठीशी असल्याचं अमेरिकन अध्यक्षांचे सुरक्षासल्लागार जेक सुलिवान यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. इराणकडून अशी भीती असलेल्या इतर पश्चिम आशियाई देशांनाही अमेरिका पाठिंबा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. इराणने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला असून त्याचा जबाब द्यावा अशी मागणी इराकने केली आहे.