नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा केला जातो. जागतिक पातळीवरील जल संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आणि “२०३०पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता” हा यामागचा हेतू आहे. “आटलेल्या भूजलाचं पुनरुज्जीवन” ही यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे. दरम्यान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जलदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकानं न्यायीक भावनेनं पाण्याचा वापर करायला हवा. शाश्वत विकासासाठी पाणी महत्त्वपूर्ण घटक आहे, असं नायडू यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकानं पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्य ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येकाचं प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत आणि त्याचं शाश्वत व्यवस्थापन याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आज जागतिक जल दिवस साजरा होत असल्याचं राज्य सभा अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ‘Ground Water – Making the Invisible Visible’ ही संयुक्त राष्ट्रांची यंदाच्या जल दिनाची संकल्पना असल्याचं ते यावेळी म्हणाले. भूगर्भातलं पाणी हे अदृश्य असलं तरी  प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये त्याचं महत्वाचं स्थान  आहे. तसंच  पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचं अस्तित्व भूगर्भातल्या पाण्यावरच अवलंबून असल्याचं ते म्हणाले. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली असून भूगर्भातल्या पाण्याचं संवर्धन ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर चीन विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. मात्र डिझेल दरवाढीवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.