नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी पर्यटन उद्योगातील सर्वसंबंधितांना अधिक जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे आवाहन केले. प्रदूषणाच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेवा पुरवठादारांना शाश्वतता आणि संवर्धन हे त्यांच्या व्यवसायाचे अविभाज्य घटक बनवायला सांगितले. संसाधनांचा वापर काळजीपूर्वक केला जावा, जेणेकरुन भावी पिढीला पर्यटनाचे लाभ मिळू शकतील, असे ते म्हणाले.

नवी दिल्लीत जागतिक पर्यटन दिन 2019 कार्यक्रमाचे उद्‌घाटन केल्यावर नायडू यांनी यंदा हा दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने भारताची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

प्रवास करताना नैतिक बाबी लक्षात ठेवायला हव्यात तसेच पर्यटनामुळे लोकांना आणि पर्यावरणाचा लाभ घ्यायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पॅराग्वेच्या पर्यटन मंत्री सोफिया अफारा यांची भेट घेतली आणि पर्यटन क्षेत्रातील दोन्ही देशांच्या सहकार्याबाबत चर्चा केली. व्हिसाचे नियम अधिक सुलभ करण्याची सूचना नायडू यांनी यावेळी केली.

उपराष्ट्रपतींनी संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेचे महासचिवांचीही भेट घेतली. पर्यटनाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्यांबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो, असे उपराष्ट्रपती म्हणाले. अनेक देशांमध्ये पर्यटन हे आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन असून, रोजगार आणि परकीय चलन मिळवण्याचा महत्वाचा स्रोत असल्याचे नायडू म्हणाले.

पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशातल्या तरुणांनी 2022 पर्यंत देशातल्या किमान 15 पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृती, वारसा, भाषा व खाद्यपदार्थ याबाबत जाणून घेण्यासाठी भारत दर्शन करण्याचे आवाहन केले.