पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षेत असलेल्या तब्बल 16 उमेदवारांना एकाच वेळी शिपाई पदाच्या नियुक्तीचा आदेश देत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलासा दिला आहे. शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने वेगाने कार्यवाही पूर्ण करीत नियुक्ती आदेश दिल्यामुळे समाधानाची आणि आनंदाची भावना उमेदवारांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे एकूण रिक्त पदाच्या वीस टक्के नियुक्त्या या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना द्यायच्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने 2011 पासूनच्या अनुकंपा पदासाठी प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर असलेल्या एकूण 78 रिक्त पदापैकी 20 टक्के उमेदवारांची शिपाई पदासाठी निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी नियुक्ती प्रक्रीयेत आणखी सुलभता आणताना उमेदवारांना आदेश देण्यापूर्वीच नियुक्तीच्या ठिकाणचा प्राधान्यक्रम विचारून त्यांच्या सोईच्या रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्ती देण्याचे निर्देश दिले, एवढेच नव्हे तर अवघ्या तासाभरात लगेच हातात नियुक्तीचा आदेश दिला. प्रशासकीय कामकाजातील ही गतिमानता आणि प्रक्रीयेतील सुलभता उमेदवारांनाही सुखावून गेली. आपल्याला हव्या त्या ठिकाणी पसंतीप्रमाणे नोकरीचे ठिकाण मिळाल्याचे समाधान उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उमेदवारांनी चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे आदेश 31 मार्चपुर्वी देण्याचे राज्य शासनाचे आदेश होते, त्याप्रमाणे गतीने प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. उमेदवारांना सोईनुसार नियुक्ती आदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय सेवेत आलेल्या नव्या उमेदवारांनी चांगले कार्य करावे, वर्ग तीन संवर्गासाठीच्या अटी पुर्ण करून पदोन्नती कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी अनुकंपा तत्वावरील प्रक्रियेबाबत यावेळी माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी मोहिमस्तरावर काम करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना या अनुषंगाने वेळोवेळी सूचना देऊन शक्य तितक्या लवकर हा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचे काम नेमके कोणत्या टप्प्यात आले याबाबत त्या सातत्याने आढावादेखील घेण्यात येत असल्याने काम वेगाने पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.