नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा विरोधातल्या संभाव्य संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही, मात्र विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी लागणारं सहकार्य मी करेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूरात वार्ताहरांशी बोलत होते. ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे अशा पक्षानं पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधी पक्ष सक्षम असायला हवा, नाहीतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासारखं होऊन बसेल असं ते म्हणाले.

महागाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. एकेकाळी  महागाईच्या विरोधात, भाजपा गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरला होता अशी आठवण करुन देत, शरद पवार यांनी  महागाई विरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असं सांगितलं. मनसे प्रमुख राज ठाकरे तीन-चार महिने भूमिगत असतात आणि त्यानंतर ते व्याख्यान देतात अशी कोपरखळी, शरद पवार यांनी राज यांच्या कालच्या सभेवर प्रतिक्रिया देताना मारली.