नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी वर्धक मात्रा आता कमाल ३७५ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी खाजगी रुग्णालयांसाठीच्या लसींच्या दरात मोठी कपात करत असल्याची घोषणा आज केली.
सीरम इन्स्टिट्यूटनं आपल्या कोविशिल्ड या लसीचा दर ६०० रुपयांवर २२५ रुपये इतका कमी केला आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
भारत बायोटेकनही कोवॅक्सिन या लसीचा दर १ हजार २०० रुपयांवरून २२५ रुपये इतका कमी केला असल्याचं, भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय सहसंचालक सुचित्रा इला यांनी सांगितलं. तर आरोग्य सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार खाजगी रुग्णालयांना लसींच्या आखून दिलेल्या किंमतीपलिकडे, लसीकरण सेवा शुल्क म्हणून जास्तीत जास्त दीडशे रुपयांचं शुल्क आकारता येणार आहे.