मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड-१९ च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ८०० च्या खाली आली आहे. राज्यात ९० नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ११५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५ हजार १७० जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २६ हजार ५७६ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४७ हजार ८१६ रुग्ण दगावले सध्या राज्यात ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिंधुदुर्ग, नंदुरबार, लातूर, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, आणि चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. मुंबईत काल ३५ रुग्ण आढळले, त्यापैकी ३२ रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. ३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत सध्या ३०५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतला कोरोनामुक्तीचा दर ९८ टक्के असून, रुग्णदुपटीचा कालावधी १६ हजार ८७१  दिवसांवर गेला आहे.