नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून ‘किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी’ या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे. यात एक कोटीहून अधिक शेतकरी सहभागी हॉटेल असा अंदाज आहे.

सामायिक सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ‘पीकविम्या’वरील देशव्यापी कार्यशाळेचा शुभारंभ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर करणार असून या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय आत्मनिर्भर भारत संमेलनात ७५ निवडक शेतकरी आणि आणि उद्योजक सहभागी होतील.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतील कृषी विकासाचे टप्पे तसच हरित क्रांती आणि अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णतेवर या मोहिमेत भर दिला जाईल. कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रावर कृषी मेळावा आणि नैसर्गिक शेतीवरील प्रदर्शनही आयोजित केलं जाणार आहे.