मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवांराना एसएसबी प्रशिक्षण वर्ग छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक,युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखतपत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांना एसएसबी मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी दिनांक 10 ते 19 ऑक्टोबर 2019 असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर राहावे असे कळविण्यात आले आहे.
एसएसबी प्रवेश वर्गासाठी खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व ह्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत आणणे आवश्यक आहे.
1) कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
2) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी.
3) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
4) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रं. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत (स. 10.00 ते सायं. 5.30) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.