नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर वाढले असले तरी देशातली सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहील, अशी ग्वाही अन्न आणि ग्राहक व्यवहार सचिव सुधांशु पांडे यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सार्वजनिक वितरण प्रणाली ही देशातील अन्न सुरक्षा योजनेचा आधार आहे, याचा लाभ जवळपास ८१ कोटी ३५ लाख नागरिकांना मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.
भारत वगळता इतर देश ४५० ते ४८० डॉलर प्रति टन दरानं गहू विकत आहेत. या वर्षी भारतात गव्हाचा प्रारंभिक साठा १९० लाख टन होता जो गेल्या वर्षीच्या २७३ लाख टनांच्या साठ्यापेक्षा थोडा कमी आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली. गव्हाचा साठा आणि उपलब्धतेच्या बाबतीत देश सुरक्षित स्थितीत आहे असं कृषी सचिव मनोज आहुजा यांनी यावेळी सांगितलं.