नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे.
ते मुंबईत पहिल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय जलपर्यटन परिषदेत बोलत होते. केंद्र सरकार पर्यटन धोरण आखत असून गतिशक्तीद्वारे प्रत्येक क्षेत्रात पर्यटन आणू शकतो. भारतात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही रेड्डी यावेळी म्हणाले.
विविध तज्ञांनी यावेळी जलपर्यटन क्षेत्रातील विविध घटकांवर सादरीकरण केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, याच मंत्रालयाचे सचिव डॉक्टर संजीव रंजन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे राजीव जलोटा, भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण अध्यक्ष संजय बंडोपाध्याय, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे महासंचालक जी. के. वी. राव आदी मान्यवर उपस्थित होते.