नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे जपानबरोबर असलेले संबंध हे जगासाठी सामर्थ्य, आदर आणि समान संकल्पाचे आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. क्वाड शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री, जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी टोकियो इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जपान यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना ७० वर्ष पूर्ण होत आहेत, आणि दोन्ही राष्ट्र एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहेत, असं ते म्हणाले. भारताची प्रगती आणि विकासात जपानचा महत्वाचा वाटा आहे, भारताचे जपानसोबतचे संबंध हे बुद्ध, ज्ञान आणि ध्यानधारणेचे आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. हवामान बदल, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वानी बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताने नेहमीच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढली आहे. २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्टं भारतानं निश्चित केलं आहे, गेल्या ८ वर्षांत देशाने लोकशाही मजबूत आणि लवचिक बनवली आहे आणि ती प्रगतीचा सर्वात शक्तिशाली स्तंभ म्हणून काम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जपानच्या व्यापार क्षेत्रातल्या धुरीणांबरोबर भरवलेल्या व्यापार गोलमेज परिषदेचं अध्यक्षस्थान मोदी यांनी भूषवलं. जपानच्या ३४ कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. भारत आणि जपानमधल्या व्यापारविषयक महत्त्वाच्या संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या. भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत, यावर भर देत प्रधानमंत्र्यांनी ‘भारत-जपान संबंधांच्या सुप्त सामर्थ्याचे सदिच्छादूत’ म्हणून, व्यापार-उदीम करणाऱ्या समुदायाचा गौरव केला. मार्च २०२२ मध्ये जपानचे प्रधानमंत्री किशिदा भारतभेटीवर आले असताना, आगामी पाच वर्षांत ५ लाख कोटी येन इतकी गुंतवणूक करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट उभय देशांनी ठरवलं होतं, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. जागतिक पातळीवर थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ मंदावला असूनही भारतानं मात्र गेल्या वित्तीय वर्षात ८४ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी विक्रमी थेट परकीय गुंतवणूक मिळवली आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेबद्दल जगाकडून मिळालेलं हे विश्वासमतच म्हटलं पाहिजे, असं ते म्हणाले त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी भारतात अधिक सहभागी होऊन ‘जपान सप्ताहाच्या’ रूपानं भारताच्या विकासयात्रेत योगदान द्यावं, असं निमंत्रणही त्यांनी दिलं.जपानी कंपनी NEC कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एंडो, युनिक्लोचे अध्यक्ष तदाशी यानाई, सुझुकी मोटर्सचे सल्लागार ओसामू सुझुकी, सॉफ्टबँक समूहाचे संस्थापक मासायोशी सोन यांच्याशी त्यांनी संवाद साधला. या दौऱ्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यात आज भारत-प्रशांत आर्थिक मंचाचं उद्घाटन प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या उपस्थितीत झालं. सर्वसमावेशक भारत-प्रशांत आर्थिक मंचासाठी काम करायला भारत उत्सुक असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत-प्रशांत क्षेत्रात जगातली ५० टक्के लोकसंख्या एकवटलेली आहे, जगाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ६० टक्के भाग या देशांकडून येतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यावेळी सांगितलं.