मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पाणी प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेत भाजपाने आज अनेक ठिकाणी जल आक्रोश मोर्चा काढला. औरंगाबाद इथं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात औरंगाबादला एक हजार ६८० कोटी रुपयांची  पाणीपुरवठा योजना मंजूर केली होते,  मात्र महाविकास आघाडी सरकार आतापर्यंत फक्त अर्धा किलोमीटर इतकीच पाईपलाईन टाकू शकले आहेत, अशी टीका फडनवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना  केली. या योजनेसाठी आतापर्यंत वापरलेला निधी हा केंद्राने दिला होता, नागपूरला ७ दिवस २४ तास पाणी पुरवठ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे असं त्यांनी  सांगितले. हा जलआक्रोश मोर्चा औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जाणार असून  देवेंद्र फडनवीस यांच्या सभेनं मोर्चाची सांगता होणार आहे.