मुंबई : कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली.
कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिक देखील यशस्वी झाले आहे. यापुढे नागरी उड्डयण मंत्रालयाची (डीजीसीए) मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. त्यांना प्रकल्प उभारण्यासाठी जागा दिली जाईल.
कॅप्टन अमोल यांचा प्रकल्प लागु करण्यासाठी उद्योग विभागाच्यावतीने एक बैठक घेतली जाईल. यामध्ये एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. शासनाकडून उद्योगांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन कॅप्टन अमोल यांच्या प्रकल्पाला दिले जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
एका मराठी माणसाने विमान तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे, त्याचा सर्वांना अभिमान आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाचे कौतुक केले आहे. यापुढे देखील राज्य शासन त्यांना सर्व सहकार्य करेल, असे उद्योगमंत्री देसाई म्हणाले.