सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने करमाळा, माढा व बार्शी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
निवडणूक खर्च निरीक्षक श्री राघवेंद्र यांनी सर्वप्रथम संशयित पेड न्यूज बाबत कशा पद्धतीने समितीचे कामकाज चालते याची माहिती संबंधित कर्मचारी यांच्याकडून जाणून घेतली. तसेच दैनंदिन अहवाल तपासलं. त्यानंतर समितीमार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील जाहिरातीवर कशापद्धतीने नियंत्रण ठेवले जाते त्याची माहिती घेऊन प्रत्येक विधानसभानिहाय कशा पद्धतीने रिपोर्टिंग केले जाते याची प्रत्यक्ष माहिती घेतली व कामकाजाची पाहणी केली जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या सोशल माध्यमावरील अकाउंटवर सोशल मीडिया एक्सपर्टकडून नियंत्रण ठेवले जात आहे व त्या कामाची माहीती खर्च निरीक्ष्क राघवेंद्र पी. यांनी घेतली.
तसेच जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रात दैनंदिन येणारे संशयित पेड न्युज व उमेदवारांच्या जाहिरातीचे स्कॅनिंग करण्यात येत असून आलेल्या जाहिराती शासकीय दराप्रमाणे किती रक्कम होते त्याची माहिती संबंधित खर्च समितीकडे पाठविण्यात येते त्याबाबतच्या अहवालाची पाहणी खर्च निरीक्षक राघवेंद्र यांनी केली.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज व मॉनिटरिंग ची यंत्रणा सक्षम असून जाहिराती देणाऱ्या व बातम्यांच्या स्वरूपात जाहिराती देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या खर्च त्याच्या खर्च अकाउंटला जमा करण्याबाबत समितीने अत्यंत कार्यक्षमपणे काम करावे अशा सूचना खर्च निरीक्षक राघवेंद्र यांनी दिल्या.
यावेळी समितीचे नोडल अधिकारी अंकुश चव्हाण यांनी खर्च निरीक्षकांना समितीमार्फत कशा पद्धतीने कामकाज केले जाते याची सविस्तर माहिती दिली तर समितीचे सदस्य सचिव सुनील सोनटक्के यांनी समितीची रचना व समितीमार्फत करण्यात येत असलेल्या माध्यम प्रमाणीकरण व इतर कामकाजाची माहिती दिली. माध्यम कक्षा मार्फत तयार करण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याची पूर्वपीठिका तसेच राज्य शासनाचे ‘मॅग्नीफिशंट महाराष्ट्र’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी टीव्ही मॉनिटर व संशयित पेड न्युज कक्षाचे प्रमुख रफिक शेख व व सचिन सोनवणे यांनी पेड न्यूज कात्रणे, टीव्ही मॉनिटरिंग रिपोर्ट, रेडिओ रिपोर्ट निवडणूक निरीक्षक यांना दाखविला तर वृत्तपत्रातील जाहिराती अहवाल रोहिदास गावडे यांनी दाखविला. तसेच उमेदवारांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण कशा पद्धतीने केले जाते या विषयीची माहिती सचिन बहुलेकर यांनी दिली.
यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक राघवेंद्र यांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण सनियंत्रण समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिक चांगले काम करण्याचे आवाहन करून काही अडचणी असतील तर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले यावेळी निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी तथा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे उपस्थित होते.