नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रा. लो. आ सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं गरीब कल्याण संमेलन हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात विविध राज्यांच्या राजधान्या, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांवर आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं मुंबईतल्या बी.पी.सी.एल रिफायनरी स्पोर्ट्स क्लब इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. ठाणे जिल्ह्यात नियोजन भवनच्या सभागृहात गरिब कल्याण संमेलन कार्यक्रमाच थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमदार रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा मुख्यालयात करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला उपस्थित लाभार्थ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नाशिक मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक शहरातील महाकवी कालीदास कलामंदिर इथं करण्यात आलं होत. या संवाद कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी .केंद्र सरकारच्या १३ विविध कल्याणकारी योजनांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत इत्यादी उपस्थित होते. बीड शहरातल्या सामाजिक न्याय भवनात गरिब कल्याण संमेलनाचं आयोजन केलं गेलं होत. या संमेलनास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. उस्मानाबाद इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेगावकर दूरदृश्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सोलापूरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला आणि उपस्थित लाभार्थ्यांशी संवाद साधला.