मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १४ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत आज काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप उद्या प्रसिद्ध होणार असून  त्यावर येत्या ६ जूनपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येतील. १३ जूनला अंतिम यादी जाहीर होईल.  मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी २३६ प्रभागांची सोडत आज काढण्यात आली. या सोडतीत अनुसूचित जातीच्या १५ जागांपैकी आठ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागांपैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. तसंच सर्वसाधारण प्रवर्गाच्या २१९ जागांपैकी १०९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी आणि भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित तसंच ज्योती अळवणी यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत महिलांच्या अनुसूचित जातीकरता ६, अनुसूचित जमातीकरता १, सर्वसाधारण महिलातंर्गत १४ जागा राखीव झाल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या ३३ प्रभागात, ९८ सदस्यांसाठी आरक्षणाची सोडत आज आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी जाहीर केली. ३९ जागा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जाती साठी च्या १७  राखीव  जागा पैकी ९ अनुसूचित जातीच्या  महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या २ जागापैकी १ जागा महिला उमेदवारासाठी  राखीव झाली आहे.

नाशिक- महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात ६७ महिलांना आरक्षणात स्थान मिळल्यानं नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. अनुसूचीत जातीच्या १९ जागांपैकी दहा महिलांसाठी तर अनुसूचीत जमातीच्या १० पैकी ५ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागपूर महानगरपालिकेत आयुक्त. राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार झाली. त्यात ७८ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं महिलांकरता ४४ जागा थेट नेमून दिलेल्या आहेत. अनुसूचित जातींच्या ३१ जागांपैकी १६ जागा प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरता १२ जागा राखीव असून त्यापैकी ६ जागा प्रवर्गातल्या महिलांकरता राखीव आहेत.